पुण्यातील प्रसंग !

 2nd Jan.2021.


आणि शेवटी मी पुण्यात उतरलो. शिवाजी नगरच्या COEP या अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर बस थांबली. आईने जाळीच्या देवाच्या यात्रेतून घेतलेली माझ्यासाठी चाकाची बॅग होती माझ्यासोबत.

 लहानपणी खूपच हौस होती अश्या बॅगींची. पण आता या भल्या आकर्षक वाटणाऱ्या थैलीचे पारायण दिसणार हे कुठं मला ठाऊक होतं. 

उतरलो तसा मला पुण्याचा ' विकास ' दिसू लागला.पुणे म्हणजे अतिशय आकर्षक शहर.मनाला भारावून घेईल अशी मराठी बोलणारी,मराठी जपणारी माणसं इथे आढळतात. पुण्यात ज्ञानाधरित समाज आढळतो.

 ज्ञानावर आधारलेली माणसं इथे आढळतात. संगीताची 'मैफल' असते.हा शब्द सुद्धा मी पुण्यातच ऐकला.'करायचंय, लिहायचंय, वाचायचंय' अशी शब्दांच्या शेवटी लाडू बाई लाडू ' य ' लावणारी मंडळी माझ्या कानावर रस्त्याने जाताना पडत गेली. वाहतुकीसाठी वेगळे मार्ग.शिवाय मी बस मधून थेट स्ट्रीट पाथ वर उतरलो. प्रत्येक क्षणाला सिटी बस.! पुण्यातील प्रवाशांची सोय पाहून मी थोडासा सुखावलो.शिवाय मेट्रोचं देखील काम सुरू होते. माझ्यासोबत नेहमीच वादविवाद आणि चर्चा करणारे मन आहे. हल्ली ते प्रत्येकाजवळच आहे. त्या प्रवाशांकडे पाहून ते मन म्हणालं, 'यांची सोय यासाठी आहे कारण हे लोक टॅक्स भरतात'. दुसऱ्या मनाने लगेच मुद्दा मांडला की," बाळ तुम्ही इथले पाहुणे,शिवाय नेमकेच बस मधून उतरला आहात.इतक्या लवकर निष्कर्ष काढू नये".

 मग मी बॅग उचलली आणि शनिवार वाड्याकडे कूच केली. पण क्षणार्धात आठवलं की आपले पन्नास रुपये त्या बस कंडक्टर जवळच राहिले. त्याने 'चिल्लर झाली की लगेच देतो' असं सांगितलं होतं.बसमध्ये मी त्याच्या जवळच बसलेलो. त्याच्या आणि माझ्या बऱ्याच गप्पा झाल्या होत्या.तेव्हा तोही मूळचा पुण्यातील आहे, असं कळलं होतं. ' वारजे ' ला राहतो मी! असं त्याने गप्पांदरम्यान सांगितलं होतं. मग लगेच विवेकी मनाने , " समझा क्या? श्रीमान तुम्ही लगेच निष्कर्ष काढत होता " असं बजावलं. पण आता त्यावर उपाय नव्हता. मी सिटी बस मध्ये बसावं की नाही असा विचार करू लागलो.कारण 'अजिंठा ते पुणे' एवढा प्रवासभर बसून बसून पायांनी अतीआराम घेतला होता,आणि तसेही शनिवार वाडा जास्त दूरही नव्हता.मग म्हटलं आपण पायीच जाऊया. पण बॅग भरपूर जड होती. बॅग उचलली तेव्हा डोक्यात आलं की या बॅगेला तर चाकेही आहेत आणि शिवाय स्ट्रीट पाथ सुद्धा आहे. कारण इकडे गावाकडे तसल्या बॅग्स असल्या तर चांगले रस्ते नसतात किंवा रस्ते असेल तर बॅग्स नसतात. तेव्हा ' हीच ती वेळ' असं म्हणत मी शनिवार वाड्याकडे धाव घेतोच, तेवढ्यात काहीतरी जाणवलं की या थैलीचं कुठेतरी बिनसले आहे. पाहतो तर एक चाक तुटलेलं. 

आपल्याकडे कोणी पाहत तर नाही ना? या हेतूने मी इकडे तिकडे बघितलं.कोणीच बघत नव्हतं. 

पण रस्त्याच्या ' त्या ' बाजूला एक तरुण मुलगी चहा घेत माझ्याकडे बघत होती.तिच्या एका हातात चहाचा कप आणि दुसऱ्या हातात सिगारेट होती. तिचे कपडेही मला बॉलिवूड मध्ये बघितल्या सारखे वाटले. पण त्याचं वर्णन इथे कशाला?. " छे , ती आपल्या ओळखीची थोडीच आहे. मग त्यात अपमान कसला? आणि का म्हणून लाज वाटू द्यावी? " आईने दिलेला मोठा रुमाल बॅगेतून काढला आणि संपूर्ण चेहऱ्याला गुंडाळला. म्हणजे कोणी ओळखीचा भेटलाच किंवा भेटलीच तर आपली हवा जायला नको. शेवटी बॅग उचलली, तिला खांद्यावर ठेवले आणि पुढे चालत गेलो. खांद्यावर मला त्या बॅगीचं काहीच ओझं जाणवलं नाही, हे विशेष होतं.


Krushna Aute 🍁

Comments